Thursday, August 24, 2006

आपण काय वाचतो? फ़क्तं पुस्तकेच वाचतो?
अनोळखी माणूस समोर आल्याबरोबर त्याचा रिस्पॉन्स वाचतो. त्याच्या डोळ्यातली ऍक्टींग वाचतो. शेकहॅंन्ड केला तर स्पर्शाची ऊब वाचण्याचा प्रयत्न करतो. "ग्लॅड टू मीट यू!" म्हणतानाचा कोरडेपणा कानांनी वाचतो. सगळ्यात शेवटी ह्याला पुन्हा भेटायचे की नाही हे मनाने वाचतो. हे सर्वं नीट वाचले तर आपण भविष्यात वाचतो.
आई मुलाला वाचते. शाळेतून घरी आलेल्या मुलाची बॉडी लॅंनग्वेज वाचते.काही बिनसलं असेल त्याचं तर तिला लगेच कळतं. त्याच मुलाचे वडिल घरी येतात तेव्हा ती दीर्घंकथा असते. लहान मुलाची लघुकथा पार्दर्शक असते. नवर्याची दीर्घकथा असते कारण त्याच्या प्रस्तावनेत काहीच उलगडा होत नाही. फ़क्तं चहा, काय कसं काय ही वातावरणनिर्मिती होते. मुख्य कथानकाची सुरुवात ऑफ़िसच्या कॅरॅक्टर्सने सुरु होते. ही दीर्घकथा सुखांतिका किंवा शोकांतिका ठरते ती त्याला तुम्ही कसे वाचता ह्यावरून!
मुलीला आई वाचते ती एकांकिका असते. ह्या एकांकिकेत राग, लोभ, नाट्यं सारं काही असतं. शेवटी आईलाच मुलगी समजते ह्या सुखांतिकेत ती संपते. वडिल ह्यात एक्स्ट्रा कलाकाराची नगण्यं भूमिका बजावतात.
वर्गात मुलांना वाचणे हा आम्हा शिक्षकांचा व्यवसायाभिमुख छंद. समजले नाही तरी समजले आहे असे दोन तीन चेहरे ठासून सांगतात ते वाचतो. एक दोघा स्कॉलर मुलांच्या चेहर्यावरच्या अडलेल्या दोन तीन चाणाक्ष डिफ़ीकल्टीज वाचतो. डिफ़ीकल्टी विचार्ल्यावर ती वेळ खाण्यासाठी की एखाद्या सुबक ठेंगणीवर ईंप्रेशन मारण्यासठी की सबजेक्ट ओरिएंटेड हेही वाचावे लागते.
जरा खुलून बोलल्यावर काही विद्यार्थ्यांच्या चेहेर्यांवर जरा पेपरबद्दल विचारू या हा भाव सांडलेला दिसतो. तर कधी मार्क्स कमी पडले तर तुम्हीच मुद्दाम कमी दिलेत हा विचार तरळून जाताना दिसतो. प्रॉक्सी मारल्यावर कसं फ़सवलं, आणि पकडलं तर "तो मी नव्हेच" हा पणशिकरांना लाजवेल असा ऍक्टिंगचा नमूना वाचता येतो.
व्हायवापूर्वी काय काय वाचलयं हे विचार्ताच,"आता काहीही सांगीतले तरी धडगत नाही" किंवा " वाघ म्हंटलं तरी खातो" हे कपाळावर लिहीलेले स्पष्टं वाचता येतं. रेफ़रन्सेस काय काय वाचलेत यावर लायब्ररी अंदमान-निकोबार मध्ये असल्याचा विचार वाचतो. फ़ाईव्ह पॉईंट समवन वाचलं का हे विचारलं तर हे एखद्या आंधळ्याला का नाही विचारत हेच दिसतं.
कॉम्प्यूटर मध्ये काही डिफ़ीकल्टी आली आणि सेंटरमधल्या विद्यार्थ्याला विचारले तर " हे काका लोक कॉम्प्यूटर मधील बालके आहेत" हे वाचतांना मजा येते. नवीन गॅजेटस, मोबाईल, रिंग टोन्स, ब्रिटनी स्पिअर्स, ह्यातील काहीही विचारा, त्यात अम्ही पीएच.डी.चे बाप आहोत हे त्यांच्या अविर्भावावरून लक्षात येतं.
"किताबे बहुत सी पढी होगी तुमने मगर कोई चेहेरा भी तुमने पढा है" ह्या ओळी जास्तं चांगल्या वाचायच्या असतील तर आर्टस/ कॉमर्स कॉलेजची ट्रिप मारावी. पुस्तकं वाचणं हे थोरमोठ्यांचं, स्कॉलर लोकांचं काम आहे. सामान्य अजाण माणूस वाचत असतो ती देहबोली, शब्दांमागचे ऊच्चार, स्पर्शाची ऊब, डोल्यांची बाहुली आणि तिचा नाच, दोन वक्यांमधला पॉज़, होकारामागचा नकार आणि नकारामागचा होकार!
मग मंडळी, हे पण वाचलेलं कळवा! (नंदनची क्षमा मागून.)
हेमंत पाटील
सूरत